छोटीशी चूक…….

काल नाशिकमध्ये ऑक्सिंजन भरतांना चूक होऊन तब्बल २२ लोकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारने लगेचच समिती स्थापन करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत सर्वजण आरोग्य यंत्रणा कशी कमी पडते आहे याचे शास्त्रीय, राजकीय विवेचन करत आहे. कुणी राज्य सरकार,तर कुणी केंद्र सरकार यांच्यावर शरसंधान साधत आहे आणि दुसरीकडे मात्र लोक ऑक्सीजन अभावी, इंजेक्शन अभावी आपला जीव गमवतांना दिसून येतो. पुन्हा पुन्हा एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे यात चूक कोणाची ???

प्रथमतः चूक ही छोटी असो किंवा मोठी तिचे समर्थन अजिबात होता कमा नये. भारतीय लोक तसे चूक शोधण्यात अत्यंत निपुण आहेत. त्यांना दुसऱ्याची बारीक चूक सापडते पण आपली मात्र चूक लक्षात येत नाही. खरे पाहता भारतात आरोग्य यंत्रणेचे विस्तृत जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. त्यात साधारणतः २-३ गावे मिळून एक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर सिव्हिल हॉस्पिटल अशी रचना आहे. पण बऱ्याच उपकेंद्रात साहित्य आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर साहित्य नाही आणि दोन्ही असेल तर पेशंट नाही अशी परिस्थिती आहे. आता याला जबाबदार कोण ? पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खाजदार, सरपंच, डॉक्टर की जनता ? हे झाले फक्त एक उदाहरण त्याबरोबर शाळा, बँका इ. च्या आजच्या दुरावस्थेला जबाबदार कोण ?

सरकार म्हणजे कोण तर सरकार म्हणजे जनता कारण जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. सरकार नालायक याचा अर्थ जनता नालायक ? गावागावात निवडणुकांच्या काळात गावातील टग्यांनी उमेदवाराकडून काही विधायक गोष्टी करून घेण्याची आश्वासन घेऊन पुढील पाच वर्षांत त्याची पूर्ती करून घेतली पाहिजे. पण आपण तसे करत नाही. दारू व मटण हे आपले साध्य राहते. एखाद्या उमेदवाराला शाळा, कॉलेज किंवा दवाखाना द्या अशी मागणी केलेली असेल असा माणूस मिळणे दुर्मिळ. शेवटी राजकीय सत्ता मिळविण्यासाठी उमेदवार काहीही करू शकतो पण त्याची मागणी जनतेने केली पाहिजे. एखाद्या उमेदवाराने अश्या जनतेच्या हिताच्या गोष्टी देऊ केल्या तरी लोक त्यांना मतदान करत नाही. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या पद्धतीने सत्ता मिळविणे हा त्यांचा अजेंडा आहे.

१.आपण दारू किंवा मटण किंवा पैसे घेतो आपल्याला वाटते त्यात काय चूक आहे ?

२. लोकप्रतनिधींना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आपणास आहे का ? तो आपला अधिकार कोणी हिरावला?

२. गावातील सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना कोण पाठीशी घालते?

३. दवाखाने, सरकारी शाळा यांच्या घसरलेल्या अवस्थेला जबाबदार कोण ? गावातील प्रत्येक व्यक्ती मंदिर, हरिनाम सप्ताह, स्मारके, पुतळे, पक्षाची शाखा बांधा म्हणून वर्गणी देता किंवा जमा करता पण एखाद्या शाळेला कधी एखादा फळा किंवा खडूचे बॉक्स देत नाही. यात चूक कोणाची?

४. शालेय व्यवस्थापन समितीवर जे लोक नियुक्त केले जातात त्यांना यातील माहिती आहे का ? माहिती असलेल्या लोकांना का नियुक्त केले जात नाही ?

एकंदरीत या परिस्थितीने आपले डोळे उघडण्यास मदत केली आहे.असे मला वाटते. आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आजच्या या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. काही सरळमार्गी जनता यात भरडली जाते हे मात्र दुर्दैवी आहे. आपल्या छोट्या छोट्या चूक इतक्या उग्र रूप धारण करतील असा विचारही आपण केला नव्हता. कालच्या ऑक्सीजण भरणाऱ्या कर्मचाऱ्यालाही आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे याचा विसर पडला असावा. जसा आपल्या सर्वांना तो पडलेला आहे. निवडणूक किंवा राजकारण हा मार्ग आहे आपल्या भविष्यातील सुधारणांचा. नवीन जाऊ द्या मात्र आहे त्या व्यवस्था बंद होणार नाही याची खबरदारी कोण घेणार. सरकारला चागल्या कामाला लावणे ही सामान्य माणसाची जबाबदारी आहे. गाडीचा ड्रायव्हर तो असला तरी मालक आपण आहोत. आपण सांगू त्याच मार्गाने लोकप्रतिनिधींना चालावे लागेल याची सदैव जाणीव आपल्याला असली पाहिजे.

After Covide College Life

भारतासह जगभर कोव्हीड १९ ने हैदोस घातलेला दिसून येतो. याचा मोठा परिणाम सध्या शैक्षणिक क्षेत्रावर झालेला दिसून येतो. कारण आता शाळा महाविद्यालये सुरु होण्याचा काळ आहे. त्यानिमित्ताने शालेय साहित्य निर्मिती , विक्री, प्रवेश इ. मुळे निर्माण होणारा रोजगार व आर्थिक चक्र बंद पडले आहे. माझी काही शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींशी फोनवरून चर्चा झाली तर दरवर्षी त्यांना या मे आणि जून मध्ये फार मागणी असते पण सध्या ते एप्रिल पासून आपली वाहने उभी करून आहे आणि साधारणपणे अजून ४ महिने तरी त्यांना कुठलेही काम मिळणार नाही. त्यामुळे कोव्हीड नंतर शाळा व महाविद्यालयांची स्थिती कशी असेल .

माझ्या मते,

१. सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊन तृप्त होणार नाही. त्यांच्या सर्व शंकाचे ऑनलाइन निरसन शक्य नाही.

२. सर्व विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये बोलावणे विद्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहे.

३. सम – विषम सूत्राने शाळा महाविद्यालये सुरु केल्यास सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण यांवर खूप पैसा खर्च करावा लागणार आहे.

४. हे सर्व करूनही प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण ? हा मोठा प्रश्न आहे.

५. महाविद्यालय स्तरावर मुले मोठी असल्याने ते सामाजिक अंतर राखतील अशी अपेक्षा आहे, पण लहान मुलांकडून हि अपेक्षा करणे चुकीचे आहे.

६. मुळात लहान मुलांवरील पूर्वीचेच ओझे (burdan) खूप असल्याने अजून कोरोनाचे ओझे वाढविणे योग्य नाही.

तात्पर्य :

१. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची घाई करू नये. शैक्षणिक वर्ष जून – मे ऐवजी बदलून घेता येईल.

२. भविष्यकाळातील सुट्ट्या रद्द केल्या तरी शैक्षणिक नुकसान सहज टाळता येईल.

३. घाईघाईने शैक्षणिक नुकसान असले शब्द वापरून विद्यार्थांना कोरोनाच्या खाईत लोटू नये.

Design a site like this with WordPress.com
Get started